तत्काळ प्रसिद्धी साठी पोलीस पाटील भरती परीक्षा उद्या गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा

तत्काळ प्रसिद्धीसाठीपोलीस पाटील भरती परीक्षा उद्या गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा अंबड उपविभागातील १८३ पदांसाठी १८६९ उमेदवार परीक्षा देणार; पारदर्शकतेसाठी कडक उपाययोजना

अंबड प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुंके

अंबड: अंबड उपविभागांतर्गत अंबड आणि घनसावंगी तालुक्यांमधील पोलीस पाटील पदांच्या १८३ रिक्त जागांसाठीची लेखी परीक्षा उद्या, रविवार दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी दोन्ही तालुक्यांमधून एकूण १८६९ उमेदवार प्रविष्ट होणार असून, अंबड आणि घनसावंगीसाठी जालना येथील ६ केंद्रांवर परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे.संपूर्ण भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक, निःपक्षपाती आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे, अशी माहिती अंबडचे तहसीलदार तथा पोलीस पाटील भरती समितीचे सचिव विजय चव्हाण यांनी दिली आहे. परीक्षेदरम्यान कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी प्रशासनाने विशेष उपाययोजना केल्या आहेत.सुरक्षित आणि पारदर्शक परीक्षेसाठी उपाययोजना: * सीसीटीव्ही आणि वेबकास्टिंग: सर्व परीक्षा केंद्रांवर आणि प्रत्येक हॉलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून, परीक्षेचे थेट वेबकास्टिंग (Live Webcasting) केले जाणार आहे. * व्हिडिओग्राफी: परीक्षा केंद्रात प्रवेशापासून ते परीक्षा संपेपर्यंत प्रत्येक उमेदवाराची स्वतंत्र व्हिडिओग्राफी करण्यात येणार आहे. * भरारी पथके व पोलीस बंदोबस्त: गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी विशेष भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली असून, प्रत्येक केंद्रावर पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात असेल.दलालांच्या आमिषाला बळी पडू नका – प्रशासनाचे आवाहनप्रशासनाने सर्व उमेदवारांना आणि त्यांच्या पालकांना आवाहन केले आहे की, ही भरती प्रक्रिया केवळ गुणवत्तेच्या आधारावर होणार आहे. नोकरी लावून देण्याचे किंवा परीक्षेत मदत करण्याचे आमिष दाखवणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर किंवा ‘दलालांवर’ विश्वास ठेवू नये.गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर फौजदारी कारवाई होणारतहसीलदार चव्हाण यांनी गैरप्रकार करणाऱ्यांना कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. कॉपी करताना, तोतयागिरी करताना, इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करताना किंवा इतर कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करताना आढळल्यास, संबंधित उमेदवारावर तात्काळ खालीलप्रमाणे कठोर कारवाई केली जाईल: * ‘महाराष्ट्र विद्यापीठ, मंडळ व इतर विनिर्दिष्ट परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांना प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम, १९८२’ नुसार तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. * यासोबतच, भारतीय दंड संहिता (IPC) कलम ४१९ (तोतयागिरी), ४२० (फसवणूक), ४६५, ४६८ (बनावट दस्तऐवज तयार करणे) आणि १२०-ब (गुन्हेगारी कट रचणे) यांसारख्या गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात येईल. * सिद्ध झाल्यास, त्या उमेदवाराला कायमस्वरूपी शासकीय नोकरभरतीसाठी ‘काळ्या यादीत’ (Blacklist) टाकण्यात येईल आणि भविष्यातील कोणत्याही शासकीय परीक्षेसाठी अपात्र ठरवले जाईल.ही संपूर्ण परीक्षा प्रक्रिया माननीय जिल्हाधिकारी महोदय, जालना आणि माननीय उपविभागीय दंडाधिकारी, अंबड, श्री. उमाकांत पारधी यांच्या थेट नियंत्रणाखाली पार पडणार आहे. पात्र उमेदवारांपर्यंत योग्य संदेश पोहोचावा आणि गैरप्रकारांना आळा बसावा यासाठी प्रशासनाने माध्यमांना सहकार्य करण्याची विनंती केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *