
राणीपार्कमध्ये रस्ते व नालींच्या कामांसाठी समाजवादी पार्टीची जोरदार मागणी
जळगांव जामोद (प्रतिनिधी) –
जळगांव जामोद नगरपरिषद कार्यक्षेत्रातील राणीपार्क परिसरात रस्ते व नाल्यांची अत्यंत दयनीय अवस्था असून नागरिकांना गंभीर गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भात समाजवादी पार्टीने नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्वरित कामे हाती घेण्याची मागणी केली आहे.समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सय्यद नफिज यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की,अॅड. करिम खान यांच्या घरापासून ते सै. नजु यांच्या घरापर्यंत रस्ता व नाल्यांचे बांधकाम करणे आवश्यक आहे.डॉ. टापरे यांच्या घरापासून अल-फारान शाळेपर्यंत रस्त्याचे बांधकाम करणे गरजेचे आहे, जेणेकरून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सुरक्षित व सोयीस्कर मार्ग मिळेल.तसेच नगरपरिषद शाळांमध्ये लग्नसमारंभाकरिता आकारण्यात येणाऱ्या भाड्यात अन्यायकारक वाढ करण्यात आली असून, पूर्वी ५०० रुपये आकारले जात असताना आता तब्बल ५,००० रुपये मागितले जात आहेत. या प्रकरणाची चौकशी करून पूर्वीप्रमाणेच दर ठेवावेत, अशी मागणीही करण्यात आली.या निवेदनावेळी समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव लियाकतखान रिजवान काझी, पदाधिकारी राजीक खान, शेख बाबू, जमीर सहारा, रिजवान खान तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, राणीपार्क परिसरातील रस्ते व नाल्यांच्या अभावामुळे पावसाळ्यात पाणी तुंबते, तर उन्हाळ्यात धुळीचे साम्राज्य निर्माण होते. शाळकरी मुलांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. यामुळेच समाजवादी पार्टीने याबाबत जोरदार पातळीवर आवाज उठवला असून, नगरपरिषद प्रशासनाने त्वरित कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
