सातपुडा कॅम्पस येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा

सातपुडा कॅम्पस येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंगे

जागतिक योग दिनाचे औचित्य साधून आज दिनांक २१ जून २०२५ रोजी स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे कृषी व उद्यानविद्या महाविद्यालय, जळगाव जामोद येथील सातपुडा कॅम्पसमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या (NSS) वतीने जागतिक योग दिन २०२५ अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ७.०० वाजता दीपप्रज्वलनाने झाली, या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.योगेश गवई यांनी योग दिनाचे महत्त्व विशद केले. “योग हा केवळ शारीरिक व्यायामापुरता मर्यादित नसून तो मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यासाठीही अत्यंत महत्त्वाचा आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात योगामुळे मनःशांती मिळते आणि ताण कमी होतो.” अशाप्रकारचे उपस्थिताना मार्गदर्शन केले.यानंतर, योग प्रशिक्षक प्रा.सचिन शिंगणे यांनी उपस्थितांना विविध योगासने आणि प्राणायाम क्रिया करून दाखवल्या, त्यानुसार ‘सूर्यनमस्कार’, ‘वज्रासन’, ‘ताडासन’, ‘वृक्षासन’, ”भुजंगासन’ यांसारख्या महत्त्वाच्या योग आसनांच्या सर्व क्रिया उपस्थिततांना शिकविल्या आणि त्यांचे फायदे समजावून सांगितले. तसेच, ‘अनुलोम-विलोम’ आणि ‘भ्रामरी’ यांसारख्या प्राणायामाचे महत्त्व आणि ते करण्याची योग्य पद्धत त्यांनी समजावून सांगितली. उपस्थितांनी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली योगासने आणि प्राणायामचा सराव केला.कार्यक्रमाच्या शेवटी, राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. अविनाश आटोळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. आभार व्यक्त करताना सांगितले की, “योग हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवला पाहिजे. यामुळे निरोगी आणि आनंदी जीवन जगण्यास मदत होईल.” या कार्यक्रमामुळे उपस्थितांना योगाचे महत्त्व समजले आणि त्यांनी नियमित योगाभ्यास करण्याचा संकल्प केला.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले. जागतिक योग दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे सातपुडा कॅम्पसमध्ये सकारात्मक आणि आरोग्यदायी वातावरणाची निर्मिती झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *