
विकसित कृषी संकल्प अभियानाचे वाशिम जिल्ह्यात भव्य आयोजन
वाशिम तालुका प्रतिनिधी संजय भरदुक मंपिर
कृषी विज्ञान केंद्र, वाशिममार्फत २९ मे ते १२ जून २०२५ दरम्यान विशेष उपक्रम राबविणार*भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या (ICAR) निर्देशानुसार *“विकसित भारत संकल्प अभियान” देशभरात दिनांक २९ मे ते १२ जून २०२५* या कालावधीत व्यापक स्तरावर राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश खरीप हंगामातील पिकांसंदर्भातील आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे, विविध शासकीय योजना व कृषी धोरणांची माहिती देणे, तसेच शेतकऱ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनातून कृषी जागरुकता निर्माण करणे हा आहे.या अभियानाद्वारे *मृदा आरोग्य पत्रिका, संतुलित व सेंद्रिय खतांचा वापर, नैसर्गिक शेती, पीक निवड व हवामान आधारित कृषी सल्ला* आदी विषयांवर तांत्रिक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. विशेषतः शास्त्रज्ञांच्या पुढाकाराने संशोधन संस्थांचे शिफारशीत तंत्रज्ञान थेट शेतकऱ्यांच्या शेतावर नेण्यात येणार आहे.विकसित भारत संकल्प अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेअंतर्गत *राष्ट्रीय संशोधन संस्था, कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे, कृषी विभाग व आत्मा* कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या संयुक्त सहभागातून कार्यरत दोन स्वतंत्र प्रशिक्षित टिम वाशिम जिल्ह्यात कार्यरत करण्यात आल्या आहेत.या टिमद्वारे दररोज प्रत्येक तालुक्यात तीन गावांमध्ये कृषी जागरुकता रथाद्वारे मार्गदर्शन शिबिरे घेण्यात येतील. अशा प्रकारे *प्रत्येक तालुक्यात १५ गावांची निवड करून, एकूण ९० ते १२० गावांमध्ये तांत्रिक सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामधून २० ते २५ हजार शेतकऱ्यांपर्यंत* आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार अपेक्षित आहे.या अभियानात गावपातळीवर सरपंच, कृषी सखी, पोलीस पाटील व शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी यांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यात येणार आहे.कृषी विज्ञान केंद्र, वाशिमचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. आर. एल. काळे यांनी वाशिम जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना या अभियानात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून विकसित आणि समृद्ध शेतीकडे वाटचाल साधता येईल.
