
दुचाकी चोरटा गजाआड पाच गुन्ह्यांची कबुली, सात मोटारसायकली जप्त
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरगे
जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून दुचाकी चोरी करणाऱ्या चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखा आणि बुलढाणा शहर पोलिसांनी संयुक्त कारवाईत अवघ्या २४ तासांत अटक केली आहे. तेजस संजय पोकळे (वय २५, रा. रोहिनखेड, ता. मोताळा) असे अटकेत घेतलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून सात मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. त्याने पाच गुन्ह्यांची कबुली दिली आहे.जिल्ह्यात मोसा चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पोलीस अधीक्षक मा. विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख पोनि. श्री. सुनिल अंबुलकर व बुलढाणा शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार श्री. रवि राठोड यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले.दिनांक १५ एप्रिल रोजी गणेश चिकुवा वैद्य (रा. कोलवड) हे आपल्या नातेवाईकाच्या उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, बुलढाणा येथे आले असताना त्यांची हिरो होंडा स्प्लेंडर प्रो मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.तपास पथकाने तांत्रिक माहितीचा अभ्यास करत आरोपीचा शोध घेतला आणि २४ तासांच्या आत तेजस पोकळे याला अटक केली. त्याच्याकडून सदर गुन्ह्यातील मोटारसायकलसह इतर आणखी सहा चोरीच्या गाड्याही हस्तगत करण्यात आल्या. आरोपीने बुलढाणा जिल्ह्यात अशा पद्धतीने आणखी गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.या संपूर्ण कारवाईत पोनि. रवि राठोड, सपोनि. प्रताप भोस, पोउपनि. रवि मोरे, अश्विनी गाडे, माधुरी साळुंके, नामदेव खवले, पोहेकॉ. प्रकाश बाजड, संदीप कायंदे, पंजाबराव साखरे, सुनिल जाधव, मनोज सोनुने, योगेश लोखंडे, युवराज शिंदे, कौतीक बोडे, विनोद बोरे आदींनी महत्वाची भूमिका बजावली.पोलीस दलाच्या या जलद आणि परिणामकारक कारवाईमुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत असून पोलिसांचे कौतुक होत आहे.
