
जागतिक महिला दिन विशेष लेखऔदार्याला परिसीमा नसणारी भगिनी : सीमा सतीश गवळी
समाजसेवेची खरी व्याख्या म्हणजे दुसऱ्यांच्या वेदना समजून घेत त्यांच्या मदतीला धावून जाणे. खामगाव, जिल्हा बुलढाणा येथील सौ. सीमा सतीश गवळी या अशाच एक संवेदनशील, औदार्यशील आणि सामाजिक जाणीवसंपन्न महिला आहेत. त्यांनी आपल्या कृतीतून समाजसेवेचा नवा आदर्श निर्माण केला आहे. जागतिक महिला दिन साजरा करताना सौ. सीमा यांचे आपला परीघ सुगंधी करण्याचे कार्य मौलिक असेच आहे.*सामाजिक जाणीव आणि कार्यशीलता*सीमा सतीश गवळी या गृहिणी असल्या तरी त्यांचे मन समाजाच्या प्रश्नांशी जोडलेले आहे. त्यांनी अनेक सामाजिक संस्थांशी संबंध प्रस्थापित करून विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे. लायन्स क्लब, महिला मंडळ यांच्या माध्यमातून विशेषतः महिला उन्नतीसाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्या वेळोवेळी मार्गदर्शन करतात तसेच महिलांना स्वावलंबी होण्यासाठी प्रेरित करतात.*कुटुंबाची जबाबदारी आणि उद्योगात सहकार्य*गृहिणी म्हणून सीमा गवळी यांनी कुटुंबाच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले आहे. आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याने चांगले शिक्षण घ्यावे, उत्तम संस्कार मिळवावेत यासाठी त्या प्रयत्नशील राहिल्या आहेत. फक्त घर आणि समाजसेवा एवढ्यावरच न थांबता त्यांनी आपल्या पतीच्या उद्योग-व्यवसायातही महत्त्वपूर्ण सहकार्य केले आहे. उद्योगात स्त्रियांनी भाग घ्यावा आणि कौटुंबिक आर्थिक प्रगतीस हातभार लावावा, असा त्यांचा दृष्टिकोन आहे.*नातेवाईकांशी आपुलकीचे संबंध*सीमा गवळी यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक पैलू म्हणजे त्यांच्या आपुलकीचे नातेवाईकांशी असलेले संबंध. त्या आपल्या कुटुंबातील आणि नातेवाईकांतील प्रत्येकाच्या सुख-दुःखात सहभागी असतात. कुणालाही काही मदतीची गरज असेल तर त्या तत्काळ मदतीसाठी पुढे येतात. त्यांच्या या स्वभावामुळे त्या आपल्या कुटुंबातील आणि समाजातील आदरणीय व्यक्ती बनल्या आहेत.*प्रेतवाहनाची गरज आणि समाजसेवा*शहरात स्मशानभूमी ही दूर अंतरावर असल्यामुळे समाजात अंत्यसंस्कारासाठी मृतदेह वाहून नेण्यासाठी अनेकदा समस्या भासते. हीच बाब लक्षात घेऊन सीमा गवळी यांनी प्रेत वाहून नेण्यासाठी एक सुशोभित गाडी उपलब्ध करून दिली. यासाठी कुटुंबातील पती, मुलगा व मुलगी यांनी मोठा पाठिंबा दिला. हा निर्णय केवळ सामाजिक जाणिवेचा नव्हे, तर माणुसकीचा सर्वोच्च आदर्श म्हणता येईल. अनेकदा गरीब आणि गरजू कुटुंबांना मृतदेह वाहून नेण्यासाठी योग्य वाहन मिळत नाही, अशा वेळी त्यांची मदत होणे हे खरोखरच प्रशंसनीय आहे. *दिव्यांगांची सेवा*गवळी परिवाराचा समाजसेवेतील आणखी एका महत्त्वाच्या पैलू म्हणजे दिव्यांगांची सेवा. मूकबधिर विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांना स्व. काशिनाथजी व स्व. प्रभावती गवळी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी मिष्ठान्न जेवण देणे. या परिवाराने जोपासलेले अन्नदान ही केवळ एक सामाजिक कृती नाही, तर प्रेम, कृतज्ञता आणि सेवा यांचे सुंदर उदाहरण आहे. अशा उपक्रमांमुळे गरजू विद्यार्थ्यांना आधार तर मिळालाच आणि समाजात सकारात्मकता पसरली आहे.*औदार्याला परिसीमा नाही*सीमा सतीश गवळी यांच्या औदार्याला खरोखरच परिसीमा नाही. समाजाच्या भल्यासाठी त्या सातत्याने कार्यरत असतात. समाजातील गोरगरीब, निराधार, गरजू व्यक्तींना मदत करण्याची त्यांची तयारी नेहमी असते. त्यांचे हे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी आहे.*समाजासाठी एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व*आजच्या युगात स्वतःच्या संसारात गुरफटून राहणारे अनेक लोक दिसतात, परंतु समाजासाठी काहीतरी करण्याची ऊर्मी असलेल्या व्यक्तींची संख्या कमी आहे. अशा परिस्थितीत सीमा सतीश गवळी यांचे कार्य समाजासाठी एक प्रकाशस्तंभ आहे. त्यांचे विचार, त्यांची समाजसेवा, आणि त्यांचा लोकांशी असलेला आत्मीयतेचा संबंध खरोखरच अनुकरणीय आहे.त्यांच्या या कार्यातून अनेकांना प्रेरणा मिळेल आणि भविष्यात आणखी लोक समाजसेवेकडे वळतील, अशी आशा आहे. सौ सीमा गवळी यांच्यासारखा आपला परीघ सुगंधी करणाऱ्या व्यक्ती समाजात अधिकाधिक असाव्यात आणि त्यांच्या कार्याचा विस्तार व्हावा, हीच सदिच्छा व जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!— तुळशिदास खिरोडकार. 9970276582
