जळगाव जामोद येथे गुणगौरव व पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न

विद्यार्थ्यांनी सोशल मीडिया पेक्षा वाचनाला प्राधान्य द्यावे -पवन पाटील तहसीलदार जळगाव जामोद
प्रतिनिधी जळगाव जामोद

जळगाव जामोद-  आजच्या डिजिटल युगात व्हाट्सअप, इंस्टाग्राम व फेसबुक सारख्या सोशल मीडिया पासून दूर राहून वाचनावर भर द्यावा.असे मौल्यवान मार्गदर्शन  जळगाव जामोद चे तहसीलदार पवन पाटील यांनी दि.१५ ऑक्टोबर रोजी शहरातील दी. न्यू इरा हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित गुणवंत विद्यार्थी गुणगौरव व पारितोषिक वितरण कार्यक्रमात केले.       शहरातील दी न्यू इरा हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थी तसेच विविध शिष्यवृत्ती वितरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन दि.१५ ऑक्टोबरला शालेय परिसरात करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  जळगाव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल जयस्वाल  होते. तर या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जळगाव जामोद चे तहसीलदार पवन पाटील, अनुप पुराणीक सचिव जळगाव शिक्षण मंडळ, प्राचार्य अविनाश कुळकर्णी, उप प्राचार्य शेख सलीम पर्यवेक्षक ओंकारराव तायडे व सुनील पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने झाली. संगीत शिक्षक अजय पुराणीक यांनी स्वागत गीताचे गायन केले तर शार्विन सराफ यांनी तबल्यावर साथ दिली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून प्राचार्य अविनाश          कुळकर्णी यांनी मागील सत्रात इयत्ता दहावी व बारावीच्या  परीक्षेत शाळेतील विद्यार्थ्यांनी  मिळालेले घवघवीत यश व निकालाची उच्च परंपरा  कायम ठेवल्याची माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.  तसेच गुणगौरव व पारितोषिक वितरण कार्यक्रमाबाबत माहिती दिली.  कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पवन पाटील यांनी त्यांच्या मार्गदर्शनात  गुणवंतांचा सत्कार करताना आज शाळेत आल्यावर शाळेच्या दिवसांची आठवण येत असल्याचे सांगून  त्यांच्या शालेय कार्यकाळात सोशल मीडिया नसल्यामुळे अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे सोपे होते मात्र आज या डिजिटल  युगात सर्व विद्यार्थ्यांनी वाचनावर भर द्यावा . गुणवंतांची संख्या दुप्पट झाली पाहिजे याकरिता नियमित अभ्यास करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगून उपस्थित विद्यार्थ्यांना उज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल जयस्वाल यांनी त्यांच्या मार्गदर्शनातून  विद्यार्थ्यांनी  या डिजिटल युगात उच्च शिक्षण घेऊन प्रगती करावी मात्र तुम्हाला घडवणाऱ्या पालक व शाळा यांच्यासोबतचे ऋणानुबंध कायम ठेवावे. स्पर्धेच्या युगात प्रगत व तांत्रिक शिक्षण गरजेचे झाले असून एकाग्रता व ध्येयाने  प्रेरित विद्यार्थी यश मिळवतात. असे प्रतिपादन केले.  गुणगौरव व पारितोषिक वितरण कार्यक्रमातून स्वर्गीय तात्यासाहेब गोडबोले स्मृती शिष्यवृत्ती, श्रीमती उषाताई गोडबोले प्रोत्साहन शिष्यवृत्ती, आबासाहेब देशपांडे स्मृती शिष्यवृत्ती यांच्यासह स्वर्गीय श्रीराम अवधूत कुटे  पारितोषिक अशी सुमारे इयत्ता बारावीच्या  गुणवंतांकरीता करिता ६०, दहावीच्या  गुणवंतांकरिता ९६ तर उर्दू माध्यमाच्या गुणवंतांकरिता २५ असे एकूण सुमारे एक लक्ष दोन हजार रुपयांची शिष्यवृत्ती व पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज सराफ यांनी केले तर दहावीचे पारितोषिक वाचन सुजाता वानखडे व केशव येवले यांनी , इयत्ता बारावीचे पारितोषिक वाचन सुचिता ढोकणे व उर्दू माध्यमाचे सय्यद हाफिस यांनी तर आभार प्रदर्शन सुहास वाघमारे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *