वैचारिक नवराञोत्सव – जागर मातृ शक्तीचाजिल्हा परिषद वडशिंगी शाळेचा नवरात्रीनिमित्त आगळावेगळा उपक्रम


जळगाव जामोद ( प्रतिनीधी ) जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना भारताला लाभलेल्या समृद्ध मातृ शक्तीची माहिती करून देण्याच्या हेतूने व अध्यापनात नवचैतन्य निर्माण करण्याकरिता जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळेतील वर्ग चौथीच्या विद्यार्थ्यांनींनी नवरात्र महोत्सवानिमित्त *वैचारिक नवरात्रोत्सव – जागर मातृ शक्तीचा* हा अनोखा कार्यक्रम वर्गशिक्षक अनिल भगत यांच्या मार्गदर्शनात राबविला.

भारतीय संस्कृतीतील शक्ती आणि भक्तीचा उत्सव म्हणजे नवरात्रोत्सव… जेव्हा जेव्हा वाईट प्रवृत्ती वाढल्या , तेव्हा कोणत्या ना कोणत्या देवतेचा अवतार झाला. त्याचप्रमाणे जेव्हा जेव्हा समाजात अनिष्ट प्रथा वाढल्या , तेव्हा तेव्हा भारतात एका मातृ शक्तीने पुढाकार घेतला व त्या प्रथा मोडून काढल्या. भारतात समरांगणी तेजाने तळपणाऱ्या विरांगणा सर्वश्रुतच आहेत तसेच सामाजिक क्रांतीत सर्वस्व वाहून घेणाऱ्या क्रांतीच्या प्रणेत्या बनलेल्या मातृशक्ती सुद्धा परिचित आहेत. या असंख्य *थोर मातृशक्तीची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी या हेतूने नवरात्रीनिमित्त नऊ निवडक मातृशक्तीचा या उपक्रमांतर्गत नऊ दिवस विविध राजकीय, सामाजिक, वैचारिक, साहित्यिक ,वैद्यकीय व इतर क्षेत्रातील नऊ स्त्रियांची वेशभूषा करत त्यांचे विचार व माहिती विद्यार्थ्यांसमोर मांडले. यामध्ये स्वराज्य जननी राष्ट्रमाता जिजाऊ, त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, अनाथांची माय सिंधुताई सपकाळ , रणमर्दाणी झाशीची राणी लक्ष्मीबाई, पहिल्या महिला राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील, अक्षरयात्री बहिणाबाई चौधरी ,पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी अशा विविध क्षेत्रातील नऊ थोर महिलांची वेशभूषा करत त्यांचे चारित्र्य विद्यार्थ्यांसमोर मांडले .
रोज एक याप्रमाणे एका महिलेची माहिती देण्यात आली .शेवटच्या दिवशी यामध्ये सहभागी श्रद्धा वाघ, अर्पिता भगत, तन्वी तायडे, समृद्धी जाधव, आरुषी जाधव ,जागृती शेवाळे ,गौरी मारोडे, आरती सोनोने, सलोनी बावणे या वर्ग चौथीतील सर्व सहभागी विद्यार्थ्यांना शाळेकडून भेटवस्तू तर शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचेकडून नगदी स्वरूपात बक्षिस देऊन गौरविण्यात आले . या उपक्रमाकरिता शाळेचे मुख्याध्यापक विजय म्हसाळ, शिक्षक सारंगधर बांगर, श्रीकृष्ण भटकर, अनिल भगत, सुनीता येनकर, वर्षा राजगुरे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वकील खान, उपाध्यक्ष पायल जाधव तर पालक व शिक्षक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *