
दोन वर्षांच्या चिमुकलीवर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया
नाशिक : अशोका मेडिकव्हरहॉस्पिटलने दोन वर्षांच्या मुलीवर मिनिमली इनवेसिव्ह कार्डियाक सर्जरी पद्धतीने यशस्वी हृदय शस्त्रक्रिया केली आहे. एवढ्या कमी वयाच्या बाळावर या पद्धतीने पहिल्यांदाच शस्त्रक्रिया करण्यात आली असून, हे हॉस्पिटलच्या वैद्यकीय तंत्रज्ञानातील कौशल्याचे उत्तम उदाहरण ठरले आहे.बाल हृदयविकारतज्ज्ञ डॉ. संतोष वाडिले यांच्या नेतृत्वाखालील टीमने ही शस्त्रक्रिया केली. मुलीच्या जन्मजात हृदयविकारामुळे तिच्या हृदयाच्या एका कप्प्यात २० एमएमआकाराचे छिद्र होते. मुलीच्या नातेवाइकांनी शस्त्रक्रियेस संमती दिल्यानंतर डॉ. सुशील पारख यांच्या मार्गदर्शनाखाली केवळ सेंटीमीटरचा छेद घेऊन हृदय शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. ही शस्त्रक्रिया आमच्यासाठी मैलाचा दगड आहे. आम्ही यामुळे अनेक कुटुंबांना नवी आशा दिली असल्याचे डॉ. पारख यांनी सांगितले. या शस्त्रक्रियेत डॉ. संतोष वाडिले, डॉ. प्रणव माळी (हृदय शल्यचिकित्सक), डॉ. संदीप भंगाळे (भूलतज्ज्ञ) यांनी मोलाचे योगदान दिले. (वा.प्र.)
