
दुहेरी खून खटल्यातील आरोपीचा जमानत अर्ज फेटाळला
अकोला जिल्हा प्रतिनिधी देवानंद खिरकर
अकोट आपसी वादातून देविदास भोजने व अजय भोजने या दोघांच्या खून प्रकरणाचा खटला सुरू असतांना आरोपी राजेश गणपत भोजने (५४) रा.भांबेरी ता. तेल्हारा याने जमानत मिळण्यासाठी दाखल केलेला अर्ज अकोट येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश बी.एम.पाटील यांनी फेटाळून लावला.फिर्यादी प्रमिला देविदास भोजने (४५) रा.भांबेरी यांचा ग्रामीण रुग्णालय तेल्हारा येथे जबाब नोंदविला असता त्यांनी जबाबात म्हटले की दि.२९/०५/२०२१ रोजी सकाळी ६ वाजता आरोपी भिमराव गणपत भोजने याच्या मुलाने फिर्यादीच्या सुनेला पळवून नेले. या जुन्या वादावरून नमुद आरोपींनी कुऱ्हाड,लोखंडी पाईप व सब्बलने जबर मारहाण करून फिर्यादीचे पती देविदास उकर्डा भोजने (५५) यांना जीवे मारले.यामधील जखमी अजय भोजने याचा सुध्दा मृत्यू झाला.फिर्यादीवरून तेल्हारा पोलिस स्टेशनमध्ये कलम ३०२,३०७,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान या प्रकरणातील आरोपीने जमानत मिळण्यासाठी अर्ज केला.सरकारच्या वतीने सरकारी वकील अजित देशमुख यांनी जमानत अर्जाला विरोध करून लेखी उत्तर व युक्तीवाद सादर केला.दोन्ही पक्षांच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने आरोपींचा जमानत अर्ज फेटाळून लावला.
