शेतकऱ्यांची ४५ लाख ९० हजारांची फसवणूक; पंजाबमधून आरोपीला अटक वाशिम स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

शेतकऱ्यांची ४५ लाख ९० हजारांची फसवणूक; पंजाबमधून आरोपीला अटक वाशिम स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

वाशिम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव):

वाशिम शहरातील शेतकऱ्यांकडून शेतीमाल खरेदी करून त्याची रक्कम न देता तब्बल ४५ लाख ९० हजार ५२ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी राज्याबाहेर जाऊन लपलेल्या आरोपीला वाशिम स्थानिक गुन्हे शाखेने पंजाबमधील जालंधर येथून अटक केली. अवतारसिंग बळवंतसिंग सचदेव (रा. वाशिम) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
शेतकरी वर्षभर काबाडकष्ट करून शेतीमालाचे उत्पादन घेतात. या शेतीमालाच्या विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर त्यांच्या आर्थिक नियोजनाचा मोठा आधार असतो. मात्र, शेतकऱ्यांकडून शेतीमाल खरेदी करून त्याची रक्कम अदा न करता आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार वाशिम शहरात समोर आला होता. याप्रकरणी आरोपीविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुमारे वर्षभरापासून फरार असलेल्या आरोपीचा तपास व शोध सुरू ठेवला होता. आरोपी जालंधर, पंजाब येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने तेथे जाऊन त्याला ताब्यात घेतले.
दरम्यान, या प्रकरणात फसवणूक नेमक्या कोणत्या पद्धतीने करण्यात आली, संबंधित शेतकऱ्यांचे व्यवहार व कागदपत्रे तसेच इतर बाबींचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा, वाशिम करीत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील व अपर पोलीस अधीक्षक लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधाकर आढे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक निलेश जाधव, सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप चव्हाण, पोलीस हेड कॉन्स्टेबल महेश वानखेडे, मंगेश गोपनारायण, पोलीस अंमलदार गोपाल चौधरी यांनी कारवाईत सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *