अवैध पाणी उपसा केल्यास मोटार पंप जप्त करणार मेडशी ग्रामपंचायतीचा इशारा

अवैध पाणी उपसा केल्यास मोटार पंप जप्त करणार मेडशी ग्रामपंचायतीचा इशारा पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीचे कडक पाऊल; सिंचन तलावावरील सर्व पाणी परवाने रद्द

वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

सध्याच्या परिस्थित अत्यल्प झालेल्या पावसामुळे नागरिकांना कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. आगामी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर निर्माण होणारी संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता, मेडशी ग्रामपंचायत प्रशासनाने पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी आणि पाणी व्यवस्थापन सुरळीत ठेवण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. यासंदर्भात मेडशी ग्रामपंचायत कर्मचारी शेख जावेद यांनी डिजिटल साऊंड यंत्राच्या साहाय्याने गावात दवंडी देऊन सर्व नागरिकांना महत्त्वपूर्ण सूचना व इशारा दिला आहे.
संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता मेडशी सिंचन तलावावरून देण्यात आलेले सर्व पाणी परवाने तत्काळ प्रभावाने रद्द करण्यात आले आहेत. तसेच गावात किंवा परिसर क्षेत्रात कोणीही अवैध पाणी उपसा करू नये, यासाठी प्रशासनाच्या वतीने विशेष भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. जर कोणी अवैध मार्गाने पाणी उपसा करताना आढळल्यास, त्यांचा मोटार पंप जप्त केला जाईल, असा सक्त इशारा प्रशासनाने दिला आहे.
याशिवाय, सार्वजनिक विहिरींवर बसवण्यात आलेल्या सर्व खाजगी मोटारी नागरिकांनी स्वतःहून काढून घ्याव्यात; अन्यथा होणाऱ्या प्रशासकीय कारवाईस संबंधित व्यक्ती स्वतः जबाबदार राहील, अशी स्पष्ट सूचना देण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी तथा महसूल विभागाच्या आदेशानुसार, मेडशी ग्रामपंचायत प्रशासनाने “पाण्याचा अपव्यय टाळा, जल ही जीवन आहे” असा संदेश देत सर्व नागरिकांनी पाणी बचतीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन मेडशी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *