
नगर परिषद रिसोडतर्फे पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाचे आवाहन कृत्रिम विसर्जन तलावाची सुविधा निर्माल्य संकलनाचीही व्यवस्था
वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)
दि,२४:-श्री गणेशोत्सव २०२६ च्या पार्श्वभूमीवर नगर परिषद रिसोड प्रशासनाच्या वतीने पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील नागरिकांनी घरगुती श्री गणेशमूर्तींचे विसर्जन नगर परिषदेने उभारलेल्या कृत्रिम विसर्जन तलावात करून पर्यावरण संवर्धनास हातभार लावावा, असे आवाहन नगर परिषद प्रशासनाने केले आहे.
‘माझी वसुंधरा अभियान’ आणि ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२६’ अंतर्गत शहरातील नैसर्गिक जलस्रोतांचे प्रदूषण रोखण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. गणेशमूर्तींच्या विसर्जनामुळे जलस्रोतांचे होणारे प्रदूषण टाळून पर्यावरणाचा समतोल राखणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
नगर परिषद प्रांगणात कृत्रिम विसर्जन तलाव
घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी नगर परिषद प्रांगण, रिसोड येथे सुसज्ज कृत्रिम विसर्जन तलावाची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी नैसर्गिक जलस्रोतांऐवजी या कृत्रिम तलावाचा वापर करावा, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.निर्माल्य संकलनासाठी स्वतंत्र व्यवस्था
गणेशमूर्तीसोबत विसर्जनासाठी येणारे हार, फुले, पत्री तसेच अन्य पूजासाहित्य पाण्यात टाकू नये, यासाठी विसर्जनस्थळी स्वतंत्र ‘निर्माल्य कलश’ ठेवण्यात आले आहेत. संकलित निर्माल्यापासून सेंद्रिय खत तयार करण्यात येणार आहे.
स्वच्छता व आवश्यक सुविधांची व्यवस्था
विसर्जनस्थळी भाविकांच्या सोयीसाठी प्रकाश व्यवस्था, स्वच्छता तसेच आवश्यक कर्मचारी तैनात ठेवण्यात येणार आहेत. गणेशभक्तांनी प्रशासनास सहकार्य करून पर्यावरणपूरक पद्धतीने गणरायाला निरोप द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
गणरायाला भावपूर्ण निरोप देतानाच निसर्गाचे रक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती तसेच रासायनिक रंगांमुळे होणारे जलप्रदूषण टाळण्यासाठी नागरिकांनी आपल्या लाडक्या बाप्पाचे विसर्जन नगर परिषदेने तयार केलेल्या कृत्रिम तलावातच करावे आणि निर्माल्य निर्माल्य कलशात जमा करावे, असे नगर परिषद रिसोड प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
“पर्यावरणाचे रक्षण करूया, कृत्रिम तलावात गणेशमूर्ती विसर्जन करूया!”
