शेतमजुराचा लोखंडी सळईने मारून खून आरोपी मध्य प्रदेशातून अटकेत

शेतमजुराचा लोखंडी सळईने मारून खून; आरोपी मध्य प्रदेशातून अटकेत

वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

दि,२४:- कारंजा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ब्राह्मणखेड शिवारात शेतात काम करणाऱ्या एका मजुराचा किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून लोखंडी सळईने डोक्यात मारून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणातील आरोपीला मध्य प्रदेशातून ताब्यात घेऊन पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संतोष काशीराम तिडके (वय ४०, व्यवसाय शेती, रा. माळीपुरा, कारंजा, जि. वाशीम) यांनी २१ सप्टेंबर रोजी कारंजा शहर पोलीस ठाण्यात रिपोर्ट दिला. त्यांनी ब्राह्मणखेड शिवारातील अमोल रुईवाले यांच्या ४० एकर शेतजमिनीचा मक्ता घेतला आहे. या शेतात दिनेश रामू उईके (रा. राजापूर ढाणा, ता. मुलताई, जि. बैतूल, मध्य प्रदेश) व त्याच्यासोबत आणखी एक मजूर काम करून तेथेच राहत होते.
२१ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे ८ वाजता फिर्यादी शेतात गेले असता दिनेश उईके व त्याच्यासोबतचा दुसरा मजूर दिसून आला नाही. त्यानंतर फिर्यादीने दिनेशच्या मोबाईलवर फोन केला. त्यावेळी दिनेशने दोघांमध्ये रात्री भांडण झाल्याचे सांगितले. संबंधित मजुराने आपल्याला चार-पाच चापटा मारल्याने आपण त्याच्या डोक्यात लोखंडी सळईने मारल्याचे आणि त्याचा मृत्यू झाल्याचे त्याने सांगितले. तसेच मृतदेह शेतातील एका खड्ड्यात पुरल्याचेही त्याने सांगितले.
पोलिसांच्या तपासात २० सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ब्राह्मणखेड येथील अमोल रुईवाले यांच्या शेतात किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर दिनेश रामू उईके याने त्याच्यासोबत काम करणाऱ्या ४० वर्षीय मजुराच्या डोक्यात लोखंडी सळईने मारहाण करून त्याचा खून केल्याचे समोर आले. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह शेतात पुरण्यात आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या प्रकरणी कारंजा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, तपासादरम्यान मृताची ओळख पटली असून त्याचे नाव युवराज घुराडी वरखडे (वय ४०, रा. छिंदवाडा, ता. मुलताई, जि. बैतूल, मध्य प्रदेश) असल्याचे निष्पन्न झाले. घटनेनंतर आरोपी दिनेश रामू उईके फरार झाला होता. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन मध्य प्रदेशातून त्याला ताब्यात घेत अटक केली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, अपर पोलीस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमर चोरे, सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप अल्लापुरकर, पोलीस उपनिरीक्षक विशाल एस. बोरकर व त्यांच्या पथकाने केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप अल्लापुरकर करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *