
सामाजिक सौहार्द कायम ठेवत आगामी गणेशोत्सव साजरा करा – जि.पो.अ. निलेश तांबे
मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
मलकापूरः आगामी गणेशोत्सव सामाजिक सौहार्द, शांतता व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी केले. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दि. १२ सप्टेंबर रोजी येथील मराठा मंगल कार्यालयात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते.आपल्या मार्गदर्शनात जिपोअ तांबे यांनी प्रशासनाच्या सूचना, न्यायालयाचे निर्देश तसेच गणेश मंडळांच्या परंपरा व सांस्कृतिक प्रथांचा विचार करून उत्सवाचे नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले. सोबतच मानवी आरोग्य आणि पर्यावरणीय दुष्परिणाम याचेही भान ठेवून उत्सव साजरे करण्यासाठी मार्गदर्शन केले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार चैनसुख संचेती होते. प्रमुख अतिथी म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप उपस्थित होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सोहन माछरे, नगराध्यक्ष अतिक जवारीवाले, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश महल्ले, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे ठाणेदार देविदास पाटील तसेच नायब तहसीलदार घोटकर यांची उपस्थिती होती. बैठकीत अशांतभाई वानखेडे, अॅड. मजिद कुरेशी, दामोदर शर्मा, राहुल देशमुख, दानिश शेख आणि ओम शिंदे यांनी मनोगत व्यक्त करून गणेशोत्सवाच्या आयोजनाबाबत विविध सूचना मांडल्या.गणेशोत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, प्रशासनाच्या सूचनांचे पालन व्हावे तसेच मंडळांच्या पारंपरिक व सांस्कृतिक उपक्रमांना योग्य नियोजन मिळावे, याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.गणेशोत्सव हा सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि परस्पर सलोख्याचा उत्सव आहे. त्यामुळे सर्वांनी एकमेकांच्या भावना व परंपरांचा आदर करून शांततेत उत्सव साजरा करावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले. दरम्यान, बैठकीत शहीद जवान सतीश सोनवणे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बैठकीचे प्रास्ताविक शहर पोलीस निरीक्षक गणेश गिरी, संचलन प्रा. डॉ. नितीन भुजबळ यांनी केले, तर आभार प्रदर्शन एमआयडीसी पोलीस ठाण्याचे ठाणेदार देविदास पाटील यांनी केले. बैठकीचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला. यावेळी विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी, राजकीय नेते, पत्रकार, माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी आणि सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
