
अंजनगाव रोडवरील अपघातप्रवण ठिकाणी १५ दिवसांत गतिरोधक बसविण्याचे आश्वासन विद्यार्थ्याच्या अपघातानंतर नागरिक आक्रमक,सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लेखी आश्वासन
अकोला जिल्हा प्रतिनिधी देवानंद खिरकर
अकोटअकोट शहरातील अंजनगाव रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयासमोर काही दिवसांपूर्वी एका विद्यार्थ्याचा अपघात होऊन तो गंभीर जखमी झाला होता. या ठिकाणी यापूर्वीही अपघाताच्या घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.विद्यालय प्रशासनाच्या वतीने या अपघातप्रवण ठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी करण्यात आली होती. यासाठी छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयाने संबंधित विभागासोबत वारंवार पत्रव्यवहार करून गतिरोधक बसविण्याची मागणी केली होती.मात्र अद्याप ठोस कार्यवाही न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती.दरम्यान विद्यार्थ्याच्या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी सुमारे आठ दिवसांपूर्वी संबंधित प्रशासनाला निवेदन देऊन रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली.यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लेखी स्वरूपात आश्वासन देत येत्या १५ दिवसांत संबंधित ठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी मान्य केली आहे. त्यामुळे नागरिकांच्या मागणीला अखेर यश आले आहे.निवेदनावेळी राजू ढोले,शिवा गोटे,रामेश्वर लिल्हारे,सहर्ष लाडोळे,गजानन प्रांजळे,सतीश प्रांजळे,यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.गतिरोधक बसविण्याची कार्यवाही वेळेत पूर्ण करून विद्यार्थ्यांसह नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करावी.अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
