
खाद्यसुरक्षा तक्रारींवर तत्काळ कारवाई होणार कधी?; ग्राहकाच्या तक्रारीनंतर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी : नागेश सुरंगे
मलकापूर शहरातील एका मिठाई विक्री केंद्रातील खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत ग्राहकाने अन्न व औषध प्रशासनाकडे ऑनलाइन तक्रार दाखल केल्यानंतरही अद्याप कोणतीही प्रत्यक्ष तपासणी अथवा कारवाई झाल्याचे दिसून न आल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी निगडित तक्रारींवर तातडीने कार्यवाही होणे अपेक्षित असताना विलंब होत असल्याने प्रशासनाच्या प्रतिसादाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.मलकापूर येथील वृंदावन नगर परिसरातील रहिवासी दिनेश आसटकार यांनी शहरातील एका मिठाई विक्री केंद्रातून खरेदी केलेल्या खाद्यपदार्थाच्या गुणवत्तेबाबत महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाकडे ऑनलाइन तक्रार नोंदविली आहे. तक्रारीनुसार, संबंधित खाद्यपदार्थाची गुणवत्ता संशयास्पद वाटल्याने तसेच त्याच्या सेवनानंतर शारीरिक त्रास झाल्याचा दावा करण्यात आला आहे.तक्रारदाराने केवळ ऑनलाइन तक्रार दाखल करून थांबले नसून अन्न व औषध प्रशासनाच्या ग्राहक सहाय्य व तक्रार निवारणासाठी उपलब्ध असलेल्या 1800 222 365 या हेल्पलाइन क्रमांकावरही संपर्क साधल्याचे सांगितले आहे. मात्र तक्रार दाखल करून तीन दिवसांहून अधिक कालावधी उलटून गेल्यानंतरही कोणतीही तपासणी, नमुना संकलन अथवा अधिकृत प्रतिसाद मिळालेला नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.तक्रारीत संबंधित आस्थापनातील खाद्यपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता मानके, अन्नसुरक्षा नियमांचे पालन, साठवण व्यवस्था तसेच विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या पदार्थांची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच आवश्यक असल्यास खाद्यपदार्थांचे नमुने अधिकृत प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवून अहवालाच्या आधारे पुढील कार्यवाही करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.दरम्यान, ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित तक्रारींना प्राधान्य देऊन तत्काळ दखल घेतली जाणे आवश्यक असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. ऑनलाइन तक्रार प्रणाली व हेल्पलाइन सेवा उपलब्ध असतानाही तक्रारींच्या निवारणात विलंब होत असेल तर अशा यंत्रणांच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत प्रश्न निर्माण होत असल्याचे मत काही नागरिकांनी व्यक्त केले.सदर प्रकरणात तक्रारदाराने केलेले आरोप हे त्यांच्या तक्रारीवर आधारित असून संबंधित बाबींची अधिकृत पडताळणी व चौकशी होणे बाकी आहे. प्रशासनाकडून तपासणी झाल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार असली तरी नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित तक्रारींवर त्वरित कारवाई होणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे
