
श्री शिवाजी महाविद्यालयात आरंभ-फ्रेशर्स फेस्टचे आयोजन
देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी
स्थानिक श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आकोट येथील मानवविज्ञान विद्याशाखेच्या वतीने “आरंभ-फ्रेशर्स फेस्ट २०२६” या नवोपक्रमाचे आयोजन करण्यात आले. नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे उत्स्फूर्त व आपुलकीनं स्वागत करणे तसेच त्यांना महाविद्यालयातील शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक वातावरणाचा परिचय करून देणे हा या कार्यक्रमामागे प्रमुख हेतू होता. ‘आरंभ’ या शब्दाचा अर्थ नवी सुरुवात असा आहे आणि तो या कार्यक्रमाच्या भावनेशी अगदी सुसंगत होता. नवगत विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयीन जीवनातील नव्या शैक्षणिक प्रवासाची ही सुरुवात होती. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने या जीवनात सहभागी व्हावे, यासाठी सकारात्मक, मैत्रीपूर्ण व समावेशक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील पांडे हे होते. डॉ. अशोक इंगळे, उपप्राचार्य यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शविली तर डॉ. संतोष कायंदे, कलाशाखा प्रमुख हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. मान्यवरांनी नवगत विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या विविध संधींचा पुरेपूर उपयोग करण्याचे आवाहन केले. महाविद्यालयीन जीवन हे केवळ शैक्षणिक यशापुरते मर्यादित नसून व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्वगुण, सर्जनशीलता, संवादकौशल्य आणि सामाजिक जाणीव विकसित करण्यासाठीही महत्त्वपूर्ण आहे, असा संदेश कार्यक्रमातून देण्यात आला. या विविधांगी कार्यक्रमात नृत्य, गायन, मिमिक्री, टायकोंडो, रांगोळी, पोस्टर मेकींग व हस्तकला अशा विविध कलाप्रकारांचा समावेश होता. यामध्ये बी.ए. भाग एक मधील ओम गावंडे व गौतम डाबेराव यांनी तयार केलेल्या ग्रंथरूपी आमंत्रणाचे सर्वत्र कौतुक झाले. आचल सरदार हिने सादर केलेल्या मिमिक्रीने तर सर्वांचे मन वेधून घेतले. तसेच विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सादरीकरणाने कार्यक्रमाला एक बहारदार रंगत आणली. या कार्यक्रमासाठी वैष्णवी मेंढे, प्रथमेश चतुरकर, कांचन चेडे, ज्ञानेश्वरी जायले, अजित पचांग, संकेत ठाकरे व इतर सर्व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे बहारदार संचालन श्रेया गाडगे व गौरी राखोंडे हिने तर आदित्य मुळे याने आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. सुधीर डुबे, धर्मा गावंडे, शिल्पा सपकाळ, ईशान राणे, किशोर लाधे व इतर सर्व प्राध्यापकांनी अथक परिश्रम घेतले. यामुळे विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्यातील संवाद अधिक दृढ झाला तसेच समावेशक व सहकार्यपूर्ण महाविद्यालयीन समुदायाची भावना बळकट झाली. नव्या शैक्षणिक वर्षाची सकारात्मक सुरुवात करण्यासाठी हा कार्यक्रम प्रभावी ठरला आणि विद्यार्थ्यांना संस्थेच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागी होण्यास प्रेरणा मिळाली.
