
शिरपूर पाणी टंचाई बाबत ग्रामपंचायत मध्ये आढावा बैठक
वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)
शिरपूर जैन येथे यावर्षी पाणीटंचाईची तिव्र समस्या भेडसावत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यासाठी ग्रामपंचायत मध्ये २५ मे रोजी आढावा बैठक घेण्यात आली. सध्या सर्वत्रच पाणी टंचाईची समस्या नागरिकांना भेडसावत आहे. यामधून यावर्षी शिरपूरचे नागरिक सुद्धा सुटले नाहीत. शिरपूर येथे पाणीपुरवठा होणाऱ्या अडोळ प्रकल्पातील जलसाठा झपाट्याने कमी होत असल्याने पाण्याची समस्या अधिकच वाढत आहे. या सोबतच पाणीपुरवठ्यावर प्रभाव टाकणाऱ्या बाबी बद्दल ग्रामपंचायत मध्ये आढावा बैठक घेण्यात आली. प्रशासक कांबळे,

उपसरपंच असलम परसुवाले, माजी सरपंच गजानन ईरतकर, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश अंभोरे, कैलास गाडे व सलीम पैलवान यांच्या उपस्थिती बैठक घेण्यात आली. यावेळी पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांच्या वतीने मोठ्या प्रमाणात गावामध्ये पाण्याची मागणी वाढली आहे. लोकांना अधिक वेळ नळा द्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. मुख्य लाईन वरील कनेक्शन तसेच विज पुरवठ्यातील व्यत्ययामुळे सुद्धा पाणीटंचाई समस्या वाढली आहे. यावर आढावा बैठकी मध्ये अतिरिक्त वेळ पाणीपुरवठा न करता पाणी पुरवठा ४५ मिनिटच प्रत्येक व्हाल मधुन करण्यात यावा, नळाला कुणीही मोटर लावु नये,नादुरुस्त अतिरिक्त मोटर दुरुस्त करण्यात येईल, मुख्य पाईप लाईन वरील कनेक्शन कट करण्याचे ठरविण्यात आले. तसेच ग्रामपंचायत मधील बोअर कोरडा पडल्याने गावातील नागरिकांना स्वस्त शुद्ध व थंड पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावी म्हणून वाटर फिल्टर कार्यान्वित करण्यासाठी ग्रामपंचायत आवारात एक बोअर घेण्यात येणार असल्याचे ठरविण्यात आले. जेणेकरून काही अंशी समस्या कमी होईल. यावेळी ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांनी आपण गावातील नागरिकांना पाणीटंचाईची झळ अधिक प्रमाणात बसू नये म्हणून कर्मचारी शंभर टक्के योगदान देत आहोत व देत राहू असे या बैठकीत ठरले आहे.
