
जैन समाजाचा तीव्र आक्रोश! साधुसंतांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाला निवेदन.सब हेडलाइन :रीवा येथे आर्यिका माताजींवरील भीषण अपघातप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी • “राष्ट्रीय संत संरक्षण धोरण” लागू करण्यासाठी प्रशासनाला निवेदन
वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव )
स्थानिक श्री दिगंबर जैन समाजाच्या वतीने पोलीस स्टेशन मालेगाव तसेच तहसीलदार यांना निवेदन देत जैन साधुसंत आणि आर्यिका माताजींच्या सुरक्षेसाठी विशेष सुरक्षा व्यवस्था लागू करण्याची जोरदार मागणी करण्यात आली. मध्य प्रदेशातील रीवा जिल्हा मुख्यालयात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २० मे २०२६ रोजी घडलेल्या भीषण अपघातात आर्यिका माताजींच्या भटक्या संघाला एका वाहनाने निर्घृणपणे चिरडल्याने संपूर्ण जैन समाजात संताप आणि दुःखाची लाट पसरली आहे. या हृदयद्रावक घटनेत पूजनीय आर्यिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून समाजाने याकडे केवळ अपघात म्हणून न पाहता निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. निवेदनात नमूद करण्यात आले की, जैन साधुसंत हे पूर्णतः निःशस्त्र, अहिंसक आणि पायी भ्रमण करणारे तपस्वी असतात. ते कोणत्याही सुरक्षेचा किंवा सुविधांचा वापर न करता समाजात शांती, संयम आणि अहिंसेचा संदेश देतात. अशा संतांवरील वाढते अपघात आणि हल्ले ही संपूर्ण समाजासाठी गंभीर चिंतेची बाब असल्याचे समाजाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. जैन समाजाने प्रशासनासमोर प्रमुख मागण्या मांडताना या घटनेची विशेष तपास पथक किंवा न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली. घटनेशी संबंधित सर्व CCTV फुटेज, व्हिडिओ आणि डिजिटल पुरावे सुरक्षित ठेवून दोषींवर कठोरतम कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच जर या घटनेमागे कोणतेही पूर्वनियोजित षडयंत्र अथवा कट असल्याचे आढळल्यास कठोर कलमे लावून कारवाई करावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले. याशिवाय “संत सुरक्षा नियमावली” लागू करून पायी भ्रमण करणाऱ्या संतांच्या सुरक्षेसाठी महामार्ग, संवेदनशील भाग आणि गर्दीच्या ठिकाणी पोलिसांचे विशेष सहकार्य, वाहतूक नियंत्रण, चेतावणी सूचक फलक आणि प्रशासकीय समन्वय व्यवस्था निर्माण करण्याची मागणी करण्यात आली. भारत सरकारने “राष्ट्रीय संत संरक्षण धोरण” तयार करून पायी प्रवास करणाऱ्या संतांसाठी राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वे, सुरक्षा SOP आणि संवेदनशील मार्गांसाठी विशेष सुरक्षा तरतूद करावी, अशी मागणी देखील समाजाने केली. संतांविरुद्ध होणारे गुन्हे हे विशेष संवेदनशील स्वरूपाचे मानले जावेत कारण संत स्वतःचा बचाव करत नाहीत, कोणत्याही वाहनाचा किंवा सुरक्षा साधनांचा वापर करत नाहीत आणि पूर्णतः अहिंसक जीवन जगतात, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले. तसेच प्रशासन आणि समाज यांच्यात प्रभावी समन्वय निर्माण करण्यासाठी स्थानिक पातळीवर “संत सुरक्षा समन्वय कक्ष” स्थापन करून आपत्कालीन संपर्क प्रणाली तयार करण्याची मागणीही करण्यात आली. जैन समाजाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले की, समाज नेहमीच शांतता, अहिंसा, कायदा आणि घटनात्मक मूल्यांवर विश्वास ठेवतो. कोणताही तणाव निर्माण करणे हा उद्देश नसून भविष्यात अशा दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती टाळणे आणि तपस्वी संतांची सुरक्षा सुनिश्चित करणे हा मुख्य हेतू आहे. “संत संरक्षण हा केवळ सामाजिक प्रश्न नसून भारताच्या आध्यात्मिक वारशाच्या संरक्षणाचा विषय आहे,” असे सांगत प्रशासनाने हा संवेदनशील मुद्दा गांभीर्याने घेऊन तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी मालेगांव जैन समाजाच्या वतीने करण्यात आली.

