
मेडशी ग्रामपंचायतीचा ‘निर्लज्ज’ कारभार; तरुणाने स्वखर्चाने केली नालेसफाई
वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव )
सरकार ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी कोट्यवधींचा निधी खर्च करत असल्याचा दावा करत आहे, तर दुसरीकडे ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार मागणी करूनही नाल्याचे खोलीकरण आणि रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाचा निषेध म्हणून, वार्ड क्रमांक ५ मधील रहिवासी आणि जावेद धनु भवानीवाले यांनी अखेर स्वतःच्या खर्चातून हे काम पूर्ण करत प्रशासनाला एक प्रकारे सणसणीत चपराक लगावली आहे. मेडशी गावातील वार्ड क्रमांक ५ मधील नाल्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती, तसेच वाढत्या अतिक्रमणामुळे रस्ताही अरुंद झाला होता. याबाबत जावेद भवानीवाले यांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र, प्रत्येक वेळी त्यांना आश्वासनापली कडे काहीही मिळाले नाही. ग्रामपंचायतीच्या या आडमुठ्या धोरणाला कंटाळून त्यांनी कोणाचीही मदत न घेता, स्वतःच्या पैशातून जेसीबी लावून नाल्याचे खोलीकरण केले आणि रस्ता अतिक्रमणमुक्त केला. या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे, ग्रामसेवकाशी वारंवार संपर्क साधला असता त्यांच्याकडून केवळ उडवाउडवीची उत्तरे मिळत होती. ग्रामसेवकाचे आपल्या कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसल्याचे लक्ष्यात आले ?असे असताना सामान्य जनतेची कामे रखडले जात आहे . जावेद भवानीवाले यांनी यावेळी सरकारकडे संताप व्यक्त करताना अत्यंत बोचरी आणि उपरोधिक मागणी केली आहे. ते म्हणाले: “जर ग्रामपंचायत स्वतःची जबाबदारी पार पाडण्यास इतकी असमर्थ असेल आणि त्यांनी जनतेला वाऱ्यावर सोडले असेल, तर अशा ‘अ कार्यक्षम’ ग्रामपंचायतीला शासनाने ‘समृद्ध अभियानांतर्गत’ सर्वोत्कृष्ट पुरस्कार देऊन गौरव करावा. जेणेकरून त्यांच्या नाकर्ते पणाची पावती संपूर्ण राज्याला मिळेल” वारंवार तक्रारी करूनही नाल्याचे खोलीकरण रखडले होते ग्रामपंचायतीची वाट न पाहता रहिवाशाने स्वखर्चातून समस्या सोडवली.
