
“आनंद निकेतन महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस उत्साहात साजरा
वरोरा : तालुका प्रतिनिधी
आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन, वरोरा येथे २४ सप्टेंबर २०२६ रोजी राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्थापना दिनानिमित्त महाविद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे,प्रमुख वक्ते म्हणून डॉ. प्रशांत वाघ तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. गोपाल वरूटकर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. धनश्री पंचभाई, डॉ. सुरेश राठोड आणि प्रा. नीरज आत्राम यांची उपस्थिती लाभली.
मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी प्रमुख वक्ता डॉ. प्रशांत वाघ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राष्ट्रीय सेवा योजनेची संकल्पना, उद्दिष्टे आणि सामाजिक कार्यातील तिचे महत्त्व विशद केले. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच समाजाशी आपले नाते दृढ करून सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
उपप्राचार्य प्रा. डॉ. गोपाल वरूटकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाची प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. कुणाल काळे यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये सेवाभाव, सामाजिक बांधिलकी, श्रमप्रतिष्ठा, नेतृत्वगुण आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी या मूल्यांची जडणघडण राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून होते, असे त्यांनी नमूद केले.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, रक्तदान, जनजागृती, ग्रामविकास, आरोग्यविषयक उपक्रम, पर्यावरण संवर्धन तसेच विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन समाजाच्या विकासासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, नेतृत्वक्षमता, संघभावना, श्रमप्रतिष्ठा आणि समाजसेवेची वृत्ती विकसित करण्याच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या उद्दिष्टांवर विशेष भर देण्यात आला. ‘Not Me But You’ — ‘मी नाही, तर तुम्ही’ या राष्ट्रीय सेवा योजनेच्या सेवाभावी विचारातून समाजहिताला प्राधान्य देण्याचा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. धनश्री पंचभाई, डॉ. सुरेश राठोड आणि प्रा. नीरज आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. स्थापना दिनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्याची आणि सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव करून देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुरेश राठोड यांनी केले. सूत्रसंचालन प्रणिता दानव यांनी केले, तर आभार प्रदर्शन साक्षी गुरनुले यांनी केले. बहुसंख्य राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमास विशेष उत्साहाचे वातावरण लाभले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
