
अकोट नपच्या वतीने पर्यावरणपूरक श्री गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची व्यवस्था.
देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी
अकोट शहरातील नागरिकांनी श्री गणेश मूर्ती विसर्जन पर्यावरणपूरक पद्धतीने करावे तसेच नैसर्गिक जलस्रोतांचे प्रदूषण होऊ नये, या उद्देशाने अकोट नगर परिषदेच्या वतीने कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली आहे.श्री गणेश विसर्जनासाठी दि. २५ सप्टेंबर व २६ सप्टेंबर २०२६ रोजी नागरिकांसाठी कृत्रिम तलावाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर कृत्रिम तलाव अकोट ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागे, नगर परिषद भुखंड, पोपटखेड रोड, अकोट येथे तयार करण्यात आला आहे. गणेशमूतींचे नैसर्गिक नदी, नाले, तलाव व इतर जलस्रोतांमध्ये विसर्जन केल्यामुळे जलप्रदूषण होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी नैसर्गिक जलस्रोतांमध्ये गणेशमूर्तीचे विसर्जन न करता नगर परिषदेतर्फे उपलब्ध करून देण्यात आलेल्या कृत्रिम तलावाचा वापर करावा, असे आवाहन अकोट नगर परिषदेतर्फे करण्यात आले आहे. तसेच विसर्जनाच्या वेळी निर्माल्य व पूजासाहित्य स्वतंत्रपणे उपलब्ध करून दिलेल्या संकलन व्यवस्थेमध्ये जमा करावे व कृत्रिम तलावाचे पावित्र्य व स्वच्छता राखण्यासाठी नगर परिषद प्रशासनास सहकार्य करावे.अकोट शहरातील सर्व गणेशभक्त नागरिकांनी या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन पर्यावरणपूरक गणेश विसर्जनास सहकार्य करावे, असे आवाहन अकोट नगर परिषद मुख्याधिकारी शशिकांत बाबर यांनी केले आहे.
