
युवकांची सामाजिक बांधिलकीतून धोकादायक गतीरोधकाला रंग दिला
वाशिम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव )
मालेगाव मार्गावरील संस्कार विद्या मंदिर परिसरात असलेल्या धोकादायक गतीरोधकामुळे वारंवार होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी गावातील युवकांनी पुढाकार घेत सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे. यावर कोणतीही शासकीय उपाययोजना न झाल्याने दोन युवकांनी स्वखर्चातून गतीरोधकाला रंग देत वाहनचालकांचे लक्ष वेधण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला. मेडशीकडे मालेगाव मार्गे प्रवेश करताना सर्वप्रथम येणाऱ्या या गतिरोधकाजवळ कोणतेही सूचना फलक नसल्यामुळे वाहनचालकांना त्याचा अंदाज येत नाही. परिणामी अनेकदा वाहनांचे संतुलन बिघडून अपघात घडत आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा वेगात येणाऱ्या वाहनांसाठी हा गतिरोधक अधिक धोकादायक ठरत आहे.याशिवाय गावाला बायपास मार्ग झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने गावातील अंतर्गत रस्त्यांकडे दुर्लक्ष केल्याची नागरिकांची तक्रार आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून त्यामुळेही अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अनेक निरपराध नागरिकांना अपघातामुळे गंभीर दुखापती, अपंगत्व तर काहींना जीव गमवावा लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत.दरम्यान, गावातील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले बुरान पठाण आणि इरफान रेघीवाले यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी तत्काळ पुढाकार घेतला. कोणत्याही शासकीय मदतीची वाट न पाहता त्यांनी स्वतःच्या खर्चातून गतिरोधकावर पांढरा व पिवळा रंग लावून तो स्पष्टपणे दिसेल असा उपक्रम राबविला. त्यामुळे आता वाहनचालकांना दूरवरूनच गतिरोधकाची जाणीव होत असून अपघात टाळण्यास मोठी मदत होत आहे. या उपक्रमामुळे गावातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. “प्रशासनाने दुर्लक्ष केले तरी युवकांनी पुढे येऊन समाजासाठी काम करणे ही खरोखरच प्रेरणादायी बाब आहे,” अशा प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहेत.तथापि, या घटनेनंतरही संबंधित विभागाने जागे होऊन योग्य त्या ठिकाणी सूचना फलक उभारणे, रस्त्यांची दुरुस्ती करणे आणि अपघातप्रवण ठिकाणी आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.मेडशीतील या युवकांच्या पुढाकारामुळे केवळ अपघातांवर नियंत्रण मिळवण्यास मदत झाली नसून समाजाप्रती असलेली जबाबदारीही अधोरेखित झाली आहे.
