
भालेगाव शिवारात चोरीस गेलेली वीज तार पुन्हा बसवलीतार चोरीमुळे पिकांचे मोठे नुकसान; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंगे
मलकापूर तालुक्यातील भालेगाव शिवारात अज्ञात व्यक्तींनी वीज तार चोरी केल्याची घटना घडल्याने शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट उभे राहिले होते. या चोरीमुळे शेतकऱ्यांना वेळेवर पिकांना पाणी देता आले नाही आणि परिणामी उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. संबंधित वीज विभागाकडून चोरीस गेलेली वीज तार पुन्हा बसवण्यात आली असली, तरी झालेले नुकसान भरून न निघणारे असल्याची भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.या प्रकारामुळे भालेगाव परिसरातील शेतकरी प्रचंड अडचणीत सापडले असून, वारंवार होणाऱ्या तार चोरीमुळे शेती करणे अधिकच कठीण बनत चालले आहे. पिकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पाण्याचा पुरवठा खंडित झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. केवळ वीज तार पुन्हा बसवून प्रशासनाने जबाबदारी झटकू नये, अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.या प्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. वीज तार चोरीमागे नेमका कुणाचा हात आहे, ही चोरी कुणाच्या संगनमताने करण्यात आली का, याचा सखोल तपास करण्यात यावा, अशी स्पष्ट मागणी त्यांनी केली. अशा घटना वारंवार घडत असतील तर शेतकऱ्यांचे नुकसान टाळणे अशक्य असल्याचेही त्यांनी नमूद केले.तसेच भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी शिवारात कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था उभारणे, नियमित गस्त घालणे आणि तार चोरी रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवणे आवश्यक असल्याचे मत नारखेडे यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांच्या कष्टावर पाणी फिरवणाऱ्या अशा प्रकारांकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.दरम्यान, प्रशासनाने या प्रकरणी तातडीने आणि ठोस पावले उचलली नाहीत, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी निलेश नारखेडे यांनी दिला. भालेगाव शिवारातील शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील, असा निर्धार संघटनेने व्यक्त केला आहे.
